Skip to main content

Posts

Showing posts from March, 2015
लाही लाही होते अंगाची ऊन असे वर कोसळलेले सृष्टीमधील सृजनाचेही संतुलन का ढासळलेले बावी-कूप नद्याही आटल्या कुठून ना कळे पाणी आणावे इतका पाऊस पडून सुद्धा का लागे थेंबास झुरावे वणवण फिरती दाट उन्हाळी भगिनी पाण्यासाठी देह तापले उन्ही करपले एका थेंबासाठी करवंदीच्या जाळी-वनांतून अंगी उठती ओरखडे तप्ततापल्या हंड्यावरही थेंब ओतला असा चरफडे त्या थेंबाचे महत्व जाणे वणवण फिरणारी बाई पाणी नासुया तुम्ही आम्ही देणे घेणे काही नाही
स्वरसाधनामंचकी दाटून मेघ यावा तंबोऱ्यातल्या सुरांचा हा आसमंत व्हावा सूर एकटाच जोगी त्याचीच मोहिनी घ्यावी दुजा चढ-उतरता बंदिश त्याची व्हावी हर एक आघातामाजी व्हावी जिवंत शाई पाऊस झोडपे कळी उमलून यावी जाई फुलपाखराची रुंजी आवर्तनी दिसावी जपमाळ मेरुस्थानी ऐसीच सम असावी की सूरदेवताही यांच्या असेल भजनी स्वरसप्तकाजिव्हाळा आवाज भीमसेनी     स्वरावलीवर स्वराचा स्वरसाज अर्थगर्भ मन-कान एक व्हावे हे संगीताचे मर्म
जीवन बिंबे जळी कशी फसलेली की स्फटिकामध्ये प्रकाशकिरणे अडली ही पायवाटही पायाला डसलेली जी दिशा दाविते सुख जिथे नसलेली ध्येयहीन हा भणाणणारा वारा सत्याविण हा सृष्टीचाच पसारा जळ ओंगळवाणे पायांतून गुरफटे जिणे भोंगळवाणे असे मानसी वाटे कधी तरल मनाला नावड फाटा फुटे आणि आवडतेही दिव्य मनी कोंदटे
सूर्य धगधगे ओकीत अंगार शांत मी निजलो लावूनिया दार कर्म पांघरुनी झालो साकार बा सूर्याशी नाही तक्रार   ना मरती ना हरती कशाने हाकारली मी कितेक स्वप्ने त्या स्वप्नांतून जागती कवने माहित नाही त्यांना लवणे पायथ्याशी मी स्वप्नफुलांच्या ओतल्या वेदना मनाच्या निखारल्या मी अपमानांच्या भोवती राशी फुलतळाच्या खबदाडांतून उठतील फुटतील फुले घनांच्या माथी बसतील उजळे भाग्य जे जे कसतील दरिद्री होतील जे जे हसतील स्वप्नफुल आवडेल देवा श्रीमंत करतील त्याचा हेवा तयांपासुनी लपवूनी ठेवा अडले नडले त्यांना दावा
मम मनी दाटती दृश्ये केविलवाणी अन अश्रू आटतो थेंब मूल्य जाणोनी अबलांची गर्दी हिंडतसे चहू रानी दुर्दैवी भगिनी दिशा धुंडिती पाणी शहरात किती धबधबा वाहते पाणी एक दिनी ही दहादा होते न्हाणी मुबलक म्हणुनी कुणी त्याग ना जाणी नळ सुरूच ठेवून खुशीत म्हणती गाणी जाई पाणी धावून जेथे मुबलक असती  नाणी गरीबाच्या तहानेस इथेही थेंबच नाही कोणी
शिळोप्याच्या गप्पांनी गजबजली ओसरी रान फिरून दमलेली गाय झाली ढोपरी बैल घाशी गाताडीला पोळी पुन्हा खाजली मांडणीला वाजती भुकेजली ताटली पोरं जेवू घालताना माय मनी साठली पोरं झाली तृप्त तिची भूक पोटी आटली किर्र झाली रात सारी खुशालीत झोपली गोठ्यातली जनावरं जागसूद पहुडली देवा म्होरं शांत दिवा मंद मंद तेवलेला घासाच्या काळजीत बाप फक्त जागलेला 
माता माती हरी आणि हर              वेलांटीचा फरक गुंजभर मानव जगती एकच पाही फरक जरी का असेल देही काळा गोरा होईल माती एकच ज्योत विविध वाती मानवात भेदभाव करिती फुटकळ असती धर्म नी जाती द्वैतामध्ये भेदच असतो भक्ती ना लवलेश राहतो       विश्व म्हणुनी विचार करूया समतेचा ध्वज हातात धरूया 
कुणी का ओढावी काळी गच्च झापडे जळी तरंगतेय शांत कुणाचे बछडे कुठे ढीग-कचऱ्यात सडे मानवी भ्रुण नरकी खपतील पालक ऐसे लंपट खुनी निर्घृण कधी उंचावरूनी फेकिती तान्हा गोळा तो छिन्नविछिन्न  देह जसा पाचोळा कर्तुत्वाने हीन पिता की चारित्र्यशून्य माता संवेदनाहीन कशी माणसे वत्सलभावही कोता माणसामधील माणूस जेव्हा अशा प्रकारे लोपे कशी फिटतील कुणी सांगावे अशी भयानक पापे 
नयनांत लालसर हेवा ओठात गुलाबी दावे आज काय म्हणुनी आले गालांवर रुसवे फुगवे मी कट्टी-फू तुजसंगे असे पुन्हा पुन्हा का म्हणसी निश्चय करिसी अबोलण्याचा पुन्हा पुन्हा का फिरसी हीच भावना खरी तरीही तू का रागे भरसी खोटे मी हसुनी दावी मग का पुन्हा दु:ख तुला ते वाटे विश्वास आहे हे म्हणसी तरीही युवती मत्सर दाविसी का विचार तुझा हा सवतीचा मग मलाच दोषी धरिसी का हे रागे खोटे भरसी तरीही हृदयी दु:खी अससी हे कावे माझे कळून तरीही वेडे पुन्हा फससी 
गर्द वनांत पोपट होता सौंदर्याच्या मस्तीत त्रास भुजंगा शांतपणे जो जीवन होता कंठीत शीळ घालूनी उंच झुलावे वाऱ्यावरच्या लहरीवर खोड्या करुनी सापाच्या चोच मारी डोक्यावर भुजंग नव्हता उडता आणिक झाडावरती चढता पोपट मुद्दाम त्रास द्यायचा त्याला येता जाता एक दिवशी लपून बसला भुजंग पाण्याखाली पोपट त्याने झपटून धरला पाणी प्यायच्या वेळी वेटाळूनिया भुजंग घाली जळी पोपटी पिंगा पिसे पसरली पाण्यावर दावला चांगला इंगा
छावणीत कोल्ह्यांच्या सिंह आज एकटा लचके जरी तोडिले भीतीयुक्त ना छटा तोडिले तरी परी हात नाही पसरले अखेरचा क्षण तरी युध्द नाही संपले शरीर जरी नखशिखांत आवळून फासले  आत्मतेज का कुणी शृंखलांत बांधले ? नेत्रसूर्य फोडीताच जाळ अजुनी पेटला चंद्राला भिऊनि कुठे सूर्य काय वाकला ? शिरकमळ छेदिले मान नाही सांडला शंभूराजा तुझ्यापुढे त्याग आज धाकला
मंत्र्यांची बुद्धी चाले राजाची मान हाले मसुद्यात जसे लिहिलेले राजा तसाच बोले हत्ती असाच हाले घोडा तसाच चाले नेईल वात तैसे हे राज्यशकट हाले उदर तिजोरी माजी खडखडाट ऐसा झाला अवघा सद्गुणधारी तो देश त्यागुनी गेला खावया नाही दाणा वाढला जादूटोणा श्रीमंत कापिती माना वाढे जनानखाना विळख्यात चांदण्यांच्या आज चंद्रमा बुडाला सैन्यात शिस्त नाही आणि पेटला सूडाला
स्वरसाधनामंचकी दाटून मेघ यावा तंबोऱ्यातल्या सुरांचा हा आसमंत व्हावा सूर एकटाच जोगी त्याचीच मोहिनी घ्यावी दुजा चढ-उतरता बंदिश त्याची व्हावी हर एक आघातामाजी व्हावी जिवंत शाई पाऊस झोडपे कळी उमलून यावी जाई फुलपाखराची रुंजी आवर्तनी दिसावी जपमाळ मेरुस्थानी ऐसीच सम असावी की सूरदेवताही यांच्या असेल भजनी स्वरसप्तकाजिव्हाळा आवाज भीमसेनी     स्वरावलीवर स्वराचा स्वरसाज अर्थगर्भ मन-कान एक व्हावे हे संगीताचे मर्म
चंद्रावानी रूप तुझ माझ्या उमललं डोळ्यात चांदण्याचं प्रेम सारं माझ्या उतरलं मनात ओठांवरी गालावरी हास्य फुलांचं खळखळलं ते पाहताना हळू हृदय आभाळ गलबललं उर्मींचा त्या पाउस आला प्रेमसरी कोसळल्या जमिनीच्या मृद्गंधानं आठवणी उसळल्या थेंब झेलत अंगावरी मोर नाचेल वनात भंगलेल प्रेम माझं तुझ्या रुजेल मनात वेगळालं तुझं-माझं झालं होतं जे वळण भूमी पाऊसधारागतं पुन्हा येऊ दे जुळून
रवी लुप्तला तरी तेज कसे चमकते शब्द विरला तरी मनी अजून दु:ख ते तेजाला अर्थ नाही दु:खाला अर्थ नाही सांजवेळ आली तरी मना दु:ख कसे नाही प्रकाश भोगण्याची इच्छा अजून कशी गेली नाही मनाला अर्थ नाही इच्छेला अर्थ नाही सुख भोगी अंधारी भोगणाऱ्या दु:ख नाही जगालाही दु:ख नाही सुखालाही दु:ख नाही जगालाही सुख नाही अखंड स्वार्थ जपणाऱ्या मानवाला अर्थ नाही परोपकारी देह व्यर्थ यासमही स्वार्थ नाही
कंठ दाटे नीर नयनी | तुकयामुर्ती येता ध्यानी ||१|| गर्जू तुकयाचे नाम | काळा सोडू भंडावून ||२|| गाऊ ऐकू पाहू तुका | आणिका झालो बहिरा मुका ||३|| बुडलो असतो मी ते वेळे | तुकारामे वाचविले ||४|| भाकू तुकयाचे आर्त | तोची आयुष्याचा अर्थ ||५|| त्याची भाकावी करुणा | जेणे दिधले जीवना ||६|| तुकाराम तुकाराम | गाता शांत होई मन ||७|| तुकाराम झाली काया | कामक्रोध गेले लया ||८|| तुकाराम बोलू वाचे | आणिक धन नाही साचे ||९|| मणी तुकया घाली साद | हा तो तुकयाचा प्रसाद ||१०||
दगड पळवणाऱ्यांची झाली तुफान गर्दी तो बुरुज देत होता आज शेवटची वर्दी अपेक्षा होती बुरुजाला सावरणाऱ्या हातांची कारण तिथे कमी नव्हती पराक्रमाच्या बातांची रक्ताचाच करून गिलावा श्रमले होते कित्येक मावळे त्या बुरुजाला थडगे ठरवून लाळ गाळीती कित्येक कावळे एक एक दगड पळवून तुम्ही नका ढासळवू आम्हाला पारतंत्र्यातल्या वेदना नसती ठावूक तुम्हाला एक एक करून सारे दगड पळवून नेती कोडगे स्मारक तोडून पर्यायाने बांधती आपले थडगे