Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015
शहरात लाईट नसते तेव्हा प्यायला नसते पाणी लाईटवरची उपकरणेही बंद होते फोनाफोनी उकाड्याचा त्रास असूनसुद्धा दारे खिडक्या बंद असतात कारण बाहेर मच्छर चिलटे शस्त्रे परजून तयार असतात कॉईलधुरानी डासांचं काहीएक वाकडं होत नसतं म्हणून शॉकची बॅट घेऊन बॅडमिंटन खेळणं भाग असतं शहरात लाईट जाते तेव्हा पोटात उसळतो आगडोंब लाईट नाही शेगडी बंद अशाप्रकारे बोंबाबोंब कधीकधी वाटे मनाला गड्या आपुली चूल बरी सुखसोयींनी अधिक माणसे परावलंबी झाली खरी लाईटवरचे पाणी जेवण लाईटवरचा वारा हे न सुखाचे आयुष्य मनुजा ही तर सुवर्णकारा  
बळ होते अंगात तळ गेलो धुंडू उठले वळ मेंदूवर   इथे कसे मांडू फुटला माझा दृष्टीकोन सांधे निखळले तुकड्यांत अस्ताव्यस्त  मन विखुरले असला जरी रांजण तरी दिसेल लोटा पूर्वग्रह दुषितांचा हाच मोठा तोटा मीही एक त्यापैकी पश्चाताप झालेला क्षमा मागायाला आता काकुळतीस आलेला विरोधक काल आज पुरस्कर्ता खंदा  आज झालो स्तुतिपाठक काल केली निंदा
बलवान दास मारुती विवेकी ज्ञानी निरुती विनयी सदा दास्यभक्ती रामकाजी सदा रती  कर्तव्यनिष्ठ सर्वदा हाती धरी महागदा रामरसी रुची सदा   स्थिरबुद्धी रामपदा वाक्‍चतुर महाबळी रामस्मरे वेळोवेळी सदा वास प्रभूजवळी हनुमंत कपिकुळी जितेंद्रिय महारुद्र पारंगत वेदशास्त्र रामनामे सदा भद्र शक्तीवान दुजा रुद्र रामरूपी सदा लीन रामरूप ज्याचे मन राम हेची जया धन  मणी भजे हनुमान
एक जात हे क्षेपक सारे जातील सत्य अधोगतीला घुसडू पाहतील शहाणे जे जे धुळीस मिळतील मातीला आकाशासम जीवन ज्यांचे त्यांतील कणभर साधावे मग ते घाला खुशाल काव्य तुमचे त्यांच्या नावे अनुभवल्यावीण किंमत नाही बोल तुझे हे फोलाचे चरणरज तू सेवी त्यांचे हेच या वेळी मोलाचे चरणरजांकित मुद्रा त्यांची लाव तू आपल्या भाळी त्यांच्या नावे काव्य लिहावे तेच पुरवतील आळी विश्वही होई उणे जरी तू तुकी पाहशील तुका त्यांच्यासमही काव्ये करशील जरी साधशील कृपा कर तू काव्ये कितीही तरीही तत्व एवढे पाळावे ज्यांच्या नावे लिहितो त्या संतास पहिले जाणावे 
अजून जरा नात्यांचे बंध थोडे कसू दे चित्र स्पष्ट होण्यासाठी धूळ थोडी बसू दे तुझे हृदय माझ्यासाठी अजून थोडे उसू दे थोडेसुद्धा त्यात अंतर आता मात्र नसू दे तुझा खरा भाव ह्या कवितेत ठसू दे अजून थोडे तुझ्या घरी बोलायला बसू दे एक तुझ्या डोळ्यातला हातावर आसू दे दुसरीकडे जरा मला गालावरचे हासू दे तोलू दे जरा मला आसू आणि हासू एवढं झाल्यावर आपण कविता लिहायला बसू 
वेणुनाद ऐकण्यास अवतीर्ण ऋषिमहंत वृंदावनी पक्षीरुपी प्रगटले साधूसंत नखचंद्र दिप्तीमान सावळीच अंगकांती पीतवस्त्रे कांतिमान गळा माळ वैजयंती संमोहित गोपस्त्रिया शिथिल नीविबंधने कर्णरंध्रे स्वरामृत हृदयस्थ कंपने रक्तिम कुंकुमचूर्ण गिरीराज मिरविती कन्यका पुलिंद त्या मुखी तृप्त सेविती   कस्तुरीतिलक माथ्यावर मनमोहक मधुर स्मित हृदयी सौम्य प्रेममूर्ती अधरावरी सदा प्रीत
भावना संपली संपली कविता ओढून ताणून कित्येक करता होतील काही सुंदरही पण कविता नाही ती तत्वता कविता येते कुठून गड्या हे कसे सांगू मी बापडा कधी कधी शब्दाश्रू सुकवते  कधी पंक्तीचा होतो सडा  कविता सगळीकडेच आहे कवितेविण अनु नाही काही स्फुरते त्याला जो प्रामाणिक सदासर्वदा तिजसी राही बोलावत जा येईल रे ती असुदे हृदय फक्त खुले पसरव ओंजळ ठेवून विश्वास मिळतील खचितच छान फुले
रस्ता ओस पडलेला शीण पायात दाटलेला जाळ काढत घुमतोय वारा सूर्य नभी पेटलेला दूर दूर चाहूल नाही माणसाचे ही पाऊल नाही विसाव्याला सावली नाही मृगजळाचीही हूल नाही जीव माझा सुकलेला खरडत रखडत चाललो मी दाट उन्हात पाणीच नाही करपत झिरपत चाललो मी चटके होते अनवाणी वारा भरला ज्वाळांनी प्राणांतील मग त्राणही गेले जागीच कोसळलो मी पाणी पाणी दुर्दशा का झाली या पृथ्वीची पाण्यासोबत आटून गेली माया इथल्या मातीची उष्म्याने देह वेढलेला श्वास होता बळावलेला दूर कुठे मरत होता वृक्ष एक धुळावलेला
पसरुनी घोंगडी वरी बसे कान्हा तोंडे झाली वेंगडी काय म्हणे आणा आणा तुम्ही शिदोरी माझियासारखी वेगळाली ज्यांची ती काल्याला पारखी पारखी तो कान्हा एकएकाच्या शिदोऱ्या उत्तम त्या घेई सारे वेगळाल्या बऱ्या बऱ्या बोले कान्हा तू घेई घेई मजसी तुझ्यावीण मज न कुणी शोभे का तुजसी तुजसी माझी मैत्री गड्या तुझ्या मोहे मंतरलो कुठून आणू शिदोरी मी घरालाही अंतरलो 
भरला काठोकाठ ओतुनी केला माठ रिकामा डोई उचलुनी सासूपुढे ती वाजविते पैंजणा लचकत मुरडत गोपी राधा डोळे मोडीत चाले दूर कुठे खेळती गोप ती कान्हासी धुंडाळे एकचं कान्हा ध्यानी मनी तो नच दुजे अंतरी ऋषिकेशी तो अवलोकितो राधिका सुंदरी मनमोहन कान्हा दोहन करितो उभी राधा शेजारी ती हसे सुंदरी म्हणे मोहना बैल दुभे का तरी ओशाळे कान्हा हसली जेव्हा राधा त्याच्यावरी धावत जाऊनि आलिंगिली ती राधिका बावरी