Skip to main content

Posts

Showing posts from November, 2014
उजळावे दीप प्रकाशावे घर दारात रांगोळी आनंदाची सर मखमली तोरणे झुलतात दारी समाधान नांदते घरोघरी प्रेमाची भाऊबीज लक्ष्मीचे पूजन निसर्गही पालवतो सृष्टीचे सृजन आधणाचं पाणी फोडलेली चिराटी मातीचे किल्ले आणि फराळाची दाटी शंकरपाळ्या चकल्या गोडगोल लाडू फटाके अग्निबाण आकाशात सोडू गरगर भुईचक्र उसळता पाउस नादात फटाक्यांच्या मुलांची हौस रहाटगाडे जीवनाचे अव्याहत फिरते आनंदाच्या क्षणांत दिवाळी सुखावते अंधकार नष्ट आणि प्रकाश होई उजळ दिवाळसणाला नेहमीची नाती येती जवळ 
अंधारल्या दाही दिशा कुट्ट काळोखी काजळी दीप सूर्याचे घेऊन उजळली दीपावली माजलेला अंधकार चाचपडणाऱ्या दिशा उगवत्या सुर्यासंगे पुन्हा पालवती आशा फाके सोन्याची झळाळी सण उजेड दिव्यांचा दूर फेकून अंधार प्रकाशाचे कण वेचा सण सुख-समाधानं सण प्रेमाची पेरणं सण आनंदाची राशी सण नात्यांची उगवणं
मोहे पावा मना विसावा कान्हा परते घरी ||धृ|| लाल आभाळी कातरवेळी ऐकू येई धून सावळी वनावनांतून कर्णफुलांतून वाजवितो बासरी ||१|| भान हरपले या गोविंदे वळीतो गोधन नाना छंदे पाठीवरुनी हात फिरवितो गाईंच्या मुरारी ||२|| गाईसंगे सैर धावितो उड्या मारितो खोड्या करितो भान विसरले गौळ-गौळणी कौतुक करिती सारी ||३|| पक्षी ते घरट्यात परतती आतुर गौळणी मनात हसती दिवे लावूनी निमित्त करुनी द्वाड पाहती हरी ||४|| लागली चाहूल यशोदा धावे हरी पाहता हृदय सुखावे सुंदर बाळा तुझ्यावाचुनी क्षण न राहवे दुरी ||५||
 उमरठ  माझा गाव मर्द मराठा मावळा वारकऱ्यांच्या हृदयी विठू नांदतो सावळा गावातल्या आयाबाया संधिकाली त्या उठती सडा,रांगोळी,दळण ओव्या-भूपाळ्या म्हणती गड्या झुंजूमुंजू झालं भाकरी बांधू न्याहारीला सर्जा-राजा बैलजोड नांगर जोखड संगतीला दिवेलागणीच्या वेळी गप्पा शिळोप्याच्या दारी सुख दु:ख वाटताती कष्टकरी शेतकरी ठसठशीत हे कुंकू चुडा हिरवा ल्यायला नऊवारी साडीमंदी मुखडा चंद्राचा शोभला पशु-पक्षी झुडुपे-झाडे माझ्या गावी हिरवळ  कशी आभाळमायेने निळी पांघरली शाल सूर्या शेलारमामा शूर ताना प्रतापी नरवीर नांदताती आमच्या गावी अभिमान वाटे थोर उमरठ माझा गाव संस्कारांनी झळाळला नाही कधी मर्यादांचा उंबरठा ओलांडला   
चंद्रावानी रूप तुझ माझ्या उमललं डोळ्यात चांदण्याचं प्रेम सारं माझ्या उतरलं मनात ओठांवरी गालावरी हास्य फुलांचं खळखळलं ते पाहताना हळू हृदय आभाळ गलबललं उर्मींचा त्या पाउस आला प्रेमसरी कोसळल्या जमिनीच्या मृद्गंधानं आठवणी उसळल्या थेंब झेलत अंगावरी मोर नाचेल वनात भंगलेल प्रेम माझं तुझ्या रुजेल मनात वेगळालं तुझं-माझं झालं होतं जे वळण भूमी पाऊसधारागतं पुन्हा येऊ दे जुळून
दिसं आलं रं सुगीचं घबाड घावलं मोक्याचं उखळ पांढरं करा रं सोनं करा टायमाचं कापडं रंगाची घालाया फोरव्हीलर फिराया बिनपैशाचं ते मिळं कसं ढाब्यावं जेवाया नेता लई बडबाडतो आम्ही चूरंमुरं खातो जय म्हणतं म्हणतं रातच्याला घरी येतो कुटून पैसा ही आणती येडी एका मता देती हात ठेवूनं आईवं राती आणाभाका घेती नाही कागुद कळालं आमचं नशीब जळालं दोनं दिस जरी बरं नाही इकासाला येळं  
मना-मनात पेटवा राष्ट्रहित जाणिवा जना-जनात सर्वथा लागुदेच वोणवा चला उठा लढा विरोधी शक्ती थांबवा मंद झाल्या विस्तवा पुन: पुन: चेतवा  ||१|| कोण जो नभी उभा आमुच्यापरीस तो त्यास युक्तीने क्षणार्धात पाठी टाकतो अतिदूर मंगळी यान त्वरे धाडीतो अतिबलाढ्य भारता जगात प्राप्त वाहवा मंद झाल्या विस्तवा पुन: पुन: चेतवा  ||२|| घोष बोला गीत गर्जा द्या आरोळी भारती नभी भिडे गर्जना शत्रू भये कांपती उंचमान कीर्तीचे जगी नगारे वाजती बाहू ध्वजदंड ते नभात उंच-उंचवा मंद झाल्या विस्तवा पुन: पुन: चेतवा  ||३|| शस्त्रसंधी उल्लंघितो भ्याड चीन काय तो आडून लपून पाक तो शत्रुघात साधितो युवकांनो युवतींनो दास तुम्हा प्रार्थितो प्रखर करा ज्योत अभिमान जागवा मंद झाल्या विस्तवा पुन: पुन: चेतवा  ||४||   
चंद्रभागे उभा तीरी मयूरपुच्छ मुकुट शिरी भक्तां अभयदान देई घेई भेट उराउरी अधरी धरी मोहरी उभा पुंडलिक द्वारी दु:ख भवताप हरी कृपा साऊली करी भक्तपाद हृदयीधरी उभा भिवरे तीरी शरणागत दासांची दैन्य पीडा ताप हरी शेषशायी शयन करी पत्नी लक्ष्मी सुंदरी योगी ध्याना आतुडसी वससी भक्ताघरी अखंडचि ध्याती उरी मंत्र रामकृष्ण हरी बीज उच्चारिता त्वरे पापाची बोहरी भवतारक विठ्ठला विनवतो तुजला घे हृदयी भक्ताला कली फार माजला
चला चला खिडकीजवळ पाहू कोण बसतं, फिरू मुंबईत मस्त ||धृ|| इ-इ-इमारत ना मम्मी ? बघ ना कित्ती उंच कुणाचं बरं खेळणं एवढं मोठ्ठ काचेचं ? सांग ना ग पटकन कुणाचं हे खेळणं पुस्तकातल्या परीचं की काळ्या मोठ्या राक्षसाचं पप्पा मला पाळण्यात न्या ना ओ बसायला हट्ट नको करू म्हणे सांगा ना या मम्मीला घाबरतेस किती अगं सोड ना हात माझा नको आता मला तुझे आईस्क्रीमपण खायला तो बघ टपटप टांगेवाला भूम भूम पळतो अंकलिपीत हलत नाही आता लबाड धावतो मम्मी मम्मी याचं नाव बाप्पालाच सांगूयात मग कसा देवबाप्पा त्याचे कान कापतो अय्या किती गोरा किनई तो बघ माणूस तिथे किती गं वेळा मम्मी त्याची त्याला पावडर लावते ? हाहाहा तो बघ त्याच्या मागचा खोडकर मुलगा त्याची मम्मी त्याला नुसतं उन्हात उभं करते शी बाई किती आवाज काचेतून पाहू दे ना पैसे मागायच्या खेळांत मला पण जाउ दे ना कुठे पळतात किती धावतात का गं एवढी घाई माझ्याएवढी मुलं उन्हात कशासाठी सांग ना अगबाई केवढ पाणी कुठल्या नळातून येतं गं एवढा मोठा बाथ टब मला सुद्धा हवा गं कट्टी घेईन नाही आणून दिलास जर तू मला एवढं...
  व्याघ्रापरी झुंजला | दुर्जनांचा ठावो बुडविला | क्षात्रधर्मासी अनुसरला | नरवीर तानाजी || तयाचिये पंथे जाऊ | शुरत्वाचे व्रत घेऊ | पाठ नेदी दाखवू | समरांगणी || पराक्रम तेज दक्षता | धैर्य झुंज प्रागल्भ्यता | अखंड वसे शूरता | आम्हा ठायी || शक्तीबळे उन्मत्तता | ज्ञानबळे अहंता | अहंबळे सत्ता | नच करू || सेवारूपी वसा घेऊ | नम्रता अलंकारे लेऊ | विकासाचे दान देऊ | समाजासी || हर महादेव बळ | कोंदटवू महीमंडळ | लावू अवगुण सकळ | देशोधडी || वारकऱ्यांसी पंढरी | प्राणाहुनी प्रिय थोरी | उमरठ पोलाद्पुरी | तैसे आम्हा || धातू मनगटे ल्यायला | हृदये वज्रीभूत जाहला | सिंहगडी लाविला | ध्वज भगवा || धीर धडधाकट ध्यास | वीर वज्राचा हा खास | उखाडीले उदेभानास | समुळही || बंधू जयाचा सूर्याजी | सूर्य जैसा नभामाजी | साथीला प्रतापी गाजी | शेलारमामा || चंद्र जैसा तारांगणी | मृगेंद्रकेसरी पशुंतूनी | तैसा वीर शोभे रणी | नरवीर तानाजी || सुभेदार सामर्थ्यवान | खड्गासहित दैदीप्यमान | शत्रूंचे करी दमन | संग्रामी जो ||  तेजप्रतापीपुंजराशी | प्राण ठेविले कर्तव्याशी | साह्य झाला शिवासी | स्व...
कान्हा गं बाई नंदाचा सावळा ||धृ|| जाऊ कशी पाहू कशी कान्हाला भेटू कशी लवतोय डावा डोळा सासूला या फसविते सासऱ्याला चुकविते हरीछंद या मनाला चुकली ही वाटं ग अडवितो घाट गं संगे घेउनी गोपाळा दंड माझा ओढीतो माठ माझा फोडीतो बाई हरी गे सोकला वनमाळी पाहुनी मन जाई मोहुनी सुख वाटते जीवाला
तुझं भरलं कपाळं माझं वशाड मोकळं माझं केसं बांधलेलं तुझं मोकळंढाकळं   तुझ्या कानात बोलका पती देई आणाभाका माझ्या हातावं उरल्या काळ्या नियतीच्या रेखा   काय हवे नको मनी सांगशील त्याच्या कानी मला सोडूनीया गेला माझ्या कुंकवाचा धनी   ज्याने प्रकाश दावला तोचं सूर्य मावळला सुखी संसाराचा त्यानं डाव अर्ध्यावं सोडला     होती सुखाची जी गाणी झाली दुःखाची विराणी प्रतिमा उराव्यात परी उरू नये आठवणी    
काजळकाळा डोह काळा रडतो रात्री भयाण सूर सुवासिनीची कधी किंकाळी खोल उमटे दूर दूर डोहाचे त्या काळे पाणी पिळवटलेली काळीजे ताशीव दगडात साठले मनावरचे ओले ओझे कधी पेटत्या ज्वालांतूनी विवाहितेचा पदर जळे निष्पाप नयनी कधी मुसमुसता अश्रू ढळे साकळलेल्या रक्तावरी जीर्ण लोंबे कातडे अर्भकाच्या देही उरली चघळायाची शुभ्र हाडे अपरात्री केकाटती किंकाळ्या भेसूर काळ्या टळटळीत उन्हात उडती तान्हेल्या पाकोळ्या
घर नाना पाटलाचं माजलेल्या डोंगराला जिथं झरा उबडला तिथं आडव्या अंगाला दोनं पिढ्या सांभाळीला पोरासोरांचा बोभाट दोन घरांचा झालेला सांधी पाटील इस्कोटं दोन जळत्या घरात डाव गोडीचा खेळला किती वेळा गावामंदी पाणउतारा झेलला मुंडोशाला बघा त्याच्या सदा झळाळी सत्वाची पाटलाच्या खंबीरतेला जोड विठ्ठल भक्तीची नाही उन्हाच्या त्या झळा या सावलीला गारं पाटलाच्या छायेमंदी गाव नांदतय सारं