Skip to main content

Posts

Showing posts from October, 2014
मन घोंघावता वारा मन सागरी किनारा मन बरसत्या धारा मन पिंपळपानुली मन सूर्य तळपता मन वृक्ष उन्मळता मन कोंब उगवता मन पिंपळपानुली मन मृगजळावानी मन अळवाचं पाणी मन लवली पापणी मन पिंपळपानुली मन पाणी डहुळतं मन पातं थरारत मन वारं भरारतं मन पिंपळपानुली मन पिक तरारलं मन नभी भरारलं मन डोहात डुंबल मन पिंपळपानुली    
उबाऱ्याच्या पांघरुणाची वाट पाहता पहाट झाली लपविता नाही लपली दुनियेपुढे जखम ओली दाटल्या गळ्याचे अश्रू मनास ना आवरले थट्टेच्या दर्यात परी धैर्य नाही सावरले प्रकाशाचे किरण पडता रक्त आणिक साकळले आक्रंदले मन जेव्हा शब्द कटू ते झोंबले अंधाराने सावरले होते उजेडाने झालो ध्वस्त चंद्र मज गोमटा भासे वाटे सूर्य व्हावा अस्त   
जवा बाप घाव घाली ठिणग्या उडती ठिकऱ्या त्याच्या काळ्या छायेमंदी माय भाजते भाकऱ्या माझा बाप काळा काळा त्याची आडदांड छाती करपल्या उन्हामंदी त्याचं दंड चकाकती शीक पडला कितीही अंगी भणाणला ताप चिवट खडक घणाशी झुंज घेई माझा बाप नाही बुक तो शिकला तरी शिकवी आमाला दोघांच्याबी फियासाठी बाप फोडी दगडाला  कष्ट पाहुनिया त्याचं नभी सूर्य झेकांडला तापल्या त्या त्वचेवरी घास आमचा शिजला त्याच्या सर्वांगी निथळं उन्ह घामाचं ते पाणी चरचरं दगडावरी गात नवेलीची गाणी - दामुशक