Skip to main content
स्वरसाधनामंचकी
दाटून मेघ यावा
तंबोऱ्यातल्या सुरांचा
हा आसमंत व्हावा

सूर एकटाच जोगी
त्याचीच मोहिनी घ्यावी
दुजा चढ-उतरता
बंदिश त्याची व्हावी

हर एक आघातामाजी
व्हावी जिवंत शाई
पाऊस झोडपे कळी
उमलून यावी जाई

फुलपाखराची रुंजी
आवर्तनी दिसावी
जपमाळ मेरुस्थानी
ऐसीच सम असावी

की सूरदेवताही
यांच्या असेल भजनी
स्वरसप्तकाजिव्हाळा
आवाज भीमसेनी  
 
स्वरावलीवर स्वराचा
स्वरसाज अर्थगर्भ
मन-कान एक व्हावे
हे संगीताचे मर्म


Comments