Skip to main content
 

व्याघ्रापरी झुंजला | दुर्जनांचा ठावो बुडविला | क्षात्रधर्मासी अनुसरला | नरवीर तानाजी ||
तयाचिये पंथे जाऊ | शुरत्वाचे व्रत घेऊ | पाठ नेदी दाखवू | समरांगणी ||
पराक्रम तेज दक्षता | धैर्य झुंज प्रागल्भ्यता | अखंड वसे शूरता | आम्हा ठायी ||
शक्तीबळे उन्मत्तता | ज्ञानबळे अहंता | अहंबळे सत्ता | नच करू ||
सेवारूपी वसा घेऊ | नम्रता अलंकारे लेऊ | विकासाचे दान देऊ | समाजासी ||
हर महादेव बळ | कोंदटवू महीमंडळ | लावू अवगुण सकळ | देशोधडी ||
वारकऱ्यांसी पंढरी | प्राणाहुनी प्रिय थोरी | उमरठ पोलाद्पुरी | तैसे आम्हा ||
धातू मनगटे ल्यायला | हृदये वज्रीभूत जाहला | सिंहगडी लाविला | ध्वज भगवा ||
धीर धडधाकट ध्यास | वीर वज्राचा हा खास | उखाडीले उदेभानास | समुळही ||
बंधू जयाचा सूर्याजी | सूर्य जैसा नभामाजी | साथीला प्रतापी गाजी | शेलारमामा ||
चंद्र जैसा तारांगणी | मृगेंद्रकेसरी पशुंतूनी | तैसा वीर शोभे रणी | नरवीर तानाजी ||
सुभेदार सामर्थ्यवान | खड्गासहित दैदीप्यमान | शत्रूंचे करी दमन | संग्रामी जो || 
तेजप्रतापीपुंजराशी | प्राण ठेविले कर्तव्याशी | साह्य झाला शिवासी | स्वराज्यस्थापने ||
शूरत्वाचा धनाढ्य | सिंहापरी बलाढ्य | स्वराज्यासी साध्य | केले ज्याने ||
ऐसा वीर तानाजी | न ख्याती ऐसी दुजी | स्वधर्माचे काजी | प्राण दिधला ||
तयाचे पुत्र आम्ही | कीर्ती हे वाढवू जनी | सेवेची शपथ घेउनी | पुढे चाललो ||



Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ