Skip to main content
चला चला खिडकीजवळ
पाहू कोण बसतं, फिरू मुंबईत मस्त ||धृ||

इ-इ-इमारत ना मम्मी ? बघ ना कित्ती उंच
कुणाचं बरं खेळणं एवढं मोठ्ठ काचेचं ?
सांग ना ग पटकन कुणाचं हे खेळणं
पुस्तकातल्या परीचं की काळ्या मोठ्या राक्षसाचं


पप्पा मला पाळण्यात न्या ना ओ बसायला
हट्ट नको करू म्हणे सांगा ना या मम्मीला
घाबरतेस किती अगं सोड ना हात माझा
नको आता मला तुझे आईस्क्रीमपण खायला


तो बघ टपटप टांगेवाला भूम भूम पळतो
अंकलिपीत हलत नाही आता लबाड धावतो
मम्मी मम्मी याचं नाव बाप्पालाच सांगूयात
मग कसा देवबाप्पा त्याचे कान कापतो


अय्या किती गोरा किनई तो बघ माणूस तिथे
किती गं वेळा मम्मी त्याची त्याला पावडर लावते ?
हाहाहा तो बघ त्याच्या मागचा खोडकर मुलगा
त्याची मम्मी त्याला नुसतं उन्हात उभं करते


शी बाई किती आवाज काचेतून पाहू दे ना
पैसे मागायच्या खेळांत मला पण जाउ दे ना
कुठे पळतात किती धावतात का गं एवढी घाई
माझ्याएवढी मुलं उन्हात कशासाठी सांग ना


अगबाई केवढ पाणी कुठल्या नळातून येतं गं
एवढा मोठा बाथ टब मला सुद्धा हवा गं
कट्टी घेईन नाही आणून दिलास जर तू मला
एवढं पाणी हवचं माझ्या सगळ्या बाहुल्यांना गं


मम्मी मम्मी झाडे बघ कशी मागे पळतात
डिस्कवरीतल्या सापासारखे रस्ते कसे वळतात
चल खाली उतरुया मला रस्त्यावर झोपू दे
इतका वेळ सोबत केली त्या आकाशात पाहू दे



Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ