Skip to main content
रस्ता ओस पडलेला
शीण पायात दाटलेला
जाळ काढत घुमतोय वारा
सूर्य नभी पेटलेला

दूर दूर चाहूल नाही
माणसाचे ही पाऊल नाही
विसाव्याला सावली नाही
मृगजळाचीही हूल नाही

जीव माझा सुकलेला
खरडत रखडत चाललो मी
दाट उन्हात पाणीच नाही
करपत झिरपत चाललो मी

चटके होते अनवाणी
वारा भरला ज्वाळांनी
प्राणांतील मग त्राणही गेले
जागीच कोसळलो मी

पाणी पाणी दुर्दशा
का झाली या पृथ्वीची
पाण्यासोबत आटून गेली
माया इथल्या मातीची

उष्म्याने देह वेढलेला
श्वास होता बळावलेला
दूर कुठे मरत होता
वृक्ष एक धुळावलेला

Comments

Popular posts from this blog

पडू दे भुरळ मनाला मोहू दे क्षणाक्षणाला.. तुझे मीपण अन माझे नाही आणि कुणाला सख्या रे बावरलेल्या रंग दे या मनाला .. साजणा स्पर्शून जा रे राजसा कणाकणाला सडा हा नक्षत्रांचा लागले मी पणाला .. मला पाकळ्यांत घे ना दूर सारुनी उन्हाला साजणा लिंपून जा रे आतुरल्या या तनाला
मज जाणवावे जे असे ते जाणिवेपल्याडले जेथ शब्दा नाद स्पर्श श्वास अन गंधाळले मज नेणिवेचा विसर नको अन जाणिवेची जाण हवी ऐहीकाची शाश्वताला जोडणारी नाळ हवी चिदाकारले चित्त हवे मज गलबलणारे मनही हवे विशुद्ध चैतन्याच्या बागा अवनीवरती मनू नवे सोंगाडी मी होऊ कसा अन मुखवट्यात मी राहू कसा सोंगाची मज सवय नको रे ओळख मजला मीच असा उरात कोरड नको उमाळे हृदयाहृदयी बंध हवे प्रेम विशुद्ध, नको आसक्ती आनंदाचे मार्ग नवे   
अर्पण केले ज्यांनी सुखाला स्वातंत्र्याच्या वेदीवरती प्राण ठेविले ज्यांनी त्यांची जाण चला ठेऊ रक्षण करण्या मातृभूमीचे झिजली ज्यांची काया तारुण्य उधळले ज्यांनी त्यांचे भान चला ठेऊ स्वातंत्र्याचा तरुवर ज्यांनी रक्तसिंचने जपला आयुष्य वेचिले ज्यांनी त्यांचे गुण चला गाऊ लौकिक राखण्या देशाचा लौकिक आपला सांडला देह समर्पिला ज्यांनी त्यांचा मान चला ठेऊ   स्वातंत्र्याचा विचार आणि विचाराच्या स्वातंत्र्याची बीजे पेरली ज्यांनी त्यांचे वाण हाती घेऊ