दवात भिजवु लेखणी
कागद ओल्या भूमीचे
काव्यफुल वेचावयाला
गंधभारल्या प्राजक्ताचे
श्वास ओळखू मृदगंधाने
कवटाळूनी झाडांचे बुंधे
बाह्या पसरुनी नाचत
हासत डोलू खेळू नाना छंदे
ओंजळीत घेऊया निर्झर
अवलोकुनी कड्याकपारी
पहाट ही सुखात संपली
सूर्य झेलुया दाट दुपारी
आली शांत संध्याकाळ
तीही कवीला फार आवडे
आखिल सृष्टी मधले काही
नाही कवीला वावडे
सूर्य अन त्याच्या किरणांचे
जसे पाउस आणि सरींचे
निसर्ग आणि या कवींचे
नाते जन्म-जन्मांतरीचे

Comments
Post a Comment