Skip to main content
आठवण तुझी सूर अनाहत होणे
लय ही सोडून ताल भरकटत जाणे
आठवण तुझी सोनसळा तारांगणे
टिपूर ओतले त्यात पुनव चांदणे
आठवण तुझी सरी  मधाच्या मधाळ
वेडी धुंद रात्र तिला सुगंधी पाल्हाळ
उबदार तुझी काया दुधापरीस दुधाळ
त्यात अखंड बुडाले माझे मन हे ओढाळ
तुझ्या केसांत केवडा आणि गाली ग जास्वंद
ओठी गुलाबाची कळी करी फुलताना धुंद
मी सडा प्राजक्ताचा तू धरणीचे अंग
कमलांगे सुखावला भ्रमर प्राशुनी मकरंद
माझे सुख तुझ्या सुखी सांग कसे मी पाहतो
तुला सुखी पाहताना सुख माझे मी मानतो
मार्ग तुझ्या सुखाचाही मला सुखाचा भासतो
म्हणूनिया त्याच्यावर मी आनंदी चालतो 

Comments